CS ची परीक्षा आता ऑगस्टमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती ICSI अर्थात इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव, प्रोफेशनल प्रोग्रॅम आणि पोस्ट मेंबरशिप क्वालिफिकेशनच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलत ऑगस्ट मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ६ जुलै ते १६ जुलै २०२० दरम्यान होणाऱ्या परीक्षा आता १८ ते २८ ऑगस्ट २०२० दरम्यान घेतल्या जाणार आहेत.

याबाबतची माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली. यापूर्वी १ ते १० जून दरम्यान होणाऱ्या सीएस फाउंडेशन च्या परीक्षा कोरोना संसर्गामुळे लांबणीवरती टाकत जुलैमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. लॉकडाऊन असताना देखील विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. मात्र, कोरोना संसर्गाची देशातील वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा आणखी काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे. आता ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.