… तर मग देशात सर्वत्र स्वस्तात मिळणार ‘कोरोना’ व्हायरसचं औषध

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची संख्या भारतात देखील झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या 60 हजारांवर पोहोचली आहे. तर 2 हजारांच्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान सुमारे 17 हजारांपेक्षा जास्त लोकांना उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 40 हजार लोकांवर अद्याप वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या विषाणूपासून सुटका मिळण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक लस शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. भारतातील वैज्ञानिक देखील अहोरात्र मेहनत घेऊन, वेगवेगळ्या चाचण्या करून यावर तोडगा काढण्यात व्यस्त आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या फेविपिरवीर (Favipiravir) या औषधांच्या क्लिनिकल चाचणीला मंजुरी मिळाली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) चे संचालक शेखर मांडे म्हणाले की, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने फेविपिरवीरसह फायटोफार्मास्यूटिकल (Phytopharmaceutical) औषधाच्या क्लिनिकल चाचणीला देखील मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही चाचणी जर यशस्वी झाली तर कोरोनाच्या उपचारासाठी कमी दरात औषध उपलब्ध होऊ शकेल.

येणाऱ्या आठवड्याभरात सुरू होतील ट्रायल

शेखर मांडे यांनी सांगितले की, एका आठवड्यात क्लिनिकल ट्रायल सुरू होणार आहे. कोरोनावर औषध बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रतिष्ठित औषध कंपन्यासोबत सीएसआयआर एकत्र काम करीत असून या संबंधी काही क्लिनिकल ट्रायल देखील सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान डीजीसीआयने दोन औषधांना ट्रायल करण्याची परवानगी दिली असून याची लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी फाइटोफर्मास्यूटिकल बद्दल सांगितले की हे औषध वनस्पतीपासून बनवण्यात आले असून यामध्ये कोणत्याही कंपाउंड्सचे मिश्रण नाही.

दीड महिन्यात होईल ट्रायल पूर्ण

तसेच फेविपिरवीर हे एक सुरक्षित औषध असल्याचे सीएसआयआरचे संचालक शेखर मांडे यांनी म्हटले आहे. या औषधाचा ट्रायलसाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेविपिरवीर हे जुन्या औषधांपैकी एक असून याचा पेटंट आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर औैषध निर्मितीसाठी याबाबत कोणाची परवानगी लागणार नाही. ही ट्रायल यशस्वी झाली तर कोरोनाच्या उपचारासाठी कमी किंमतीतील औषध उपलब्ध होण्यास मदत होईल. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या फेविपिरवीरच्या चाचणीवर बोलताना सांगितले होते की, सध्या तरी यासंदर्भात काहीही सांगू शकत नाहीत. मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी देखील पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, फेविपिरवीरवर काही आनंदाची बातमी मिळाल्यास याची माहिती सर्वाना देण्यात येईल.

पश्चिम बंगालने विकसित केली स्वस्तातील टेस्ट किट

या दरम्यानच पश्चिम बंगालच्या संशोधकांनी कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी एक स्वस्तातील किट बनवली आहे आणि या किटला भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्था ने मंजुरी देखील दिली आहे. लवकरच या किटचा वापर करण्यात येणार आहे. या किटची किंमत केवळ 500 रुपये ठेवण्यात आली आहे. ICMR च्या एका रिपोर्टच्या अहवालानुसार या किटच्या उपकरणामुळे केवळ 90 मिनिटात 100 टक्के कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे समजणार आहे. या एका किटने जवळपास 160 रुग्णांची तपासणी करता येणार आहे. तब्बल दीड महिन्यांच्या संशोधनानंतर ही किट तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.