सीएसएमटी स्थानकातील सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्यांना आग

मुंबई : वृत्तसंस्था 

मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18 वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकाम्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

लांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याने फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी देखील झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे

सीएसएमटी मेन लाइन प्लॅटफॉर्म क्र. १०/११च्या पुढे यार्डात २ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान स्लीपर कोचला अचानक आग लागली. यात संबंधित गाडीचा डबा तसेच सोलापूर एक्स्प्रेस गाडीच्या एसी डब्याची हानी झाली आहे.