माजी कुलगुरूंसह चार जण इच्छुक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील बैठकीत चार संभाव्य उमेदवारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. नगरमधून लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले, प्रताप ढाकणे हे इच्छुक आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात बहुतांश जागांचे निर्णय झाले असले, तरी नगर दक्षिणच्या जागेचा तिढा  कायम आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी सकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह खा.सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नगरचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, अंकुशराव काकडे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, प्रताप ढाकणे, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, अभिषेक कळमकर, किरण काळे आदी उपस्थित होते.

दक्षिणची जागा कँग्रेसला सोडण्याच्या विषयावर कुठलाही चर्चा न करता दक्षिणेची जागा निवडणून आणण्यासाठी तालुकापातळीपर्यंत नियोजन करुन कामाला लागा, असा आदेश बैठकीत देण्यात आल्या. तसेच चार इच्छुक नावांची यादीही पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे सोपविण्यात सांगण्यात येत आहे.

निमसेंच्या नाव नव्याने चर्चेत

डॉ. सर्जेराव निमसे यांनी लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनी अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. सध्या ते राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा अद्याप पर्यंत कुठलाही सहभाग नाही. पहिल्यांदाच ते राजकारणात उतरत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभेसाठी इच्छुक आहेत.

पवारांचे ते वक्तव्य खरे ठरणार का?

डॉ. निमसे यांना भविष्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नगर येथे मागील आठवड्यातील एका जाहीर कार्यक्रमात दिले होते. निमसे हे लोकसभेसाठी इच्छुक असलल्याने पवार यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.