‘तू मेरी नही हुई तो…’, भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचे चाकूने ओठ कापले

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून विकृत तरुणाने एका तरुणीचे ओठ धारदार चाकूने कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.9) शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर सोमवारी (दि.12) शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्तार अब्दुल रहीम अंसारी (वय-23 रा. किडवाई नगर) व शाहिद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन विकृत तरुणांची नावे आहे. आरोपी मुक्तार याचे परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मुक्तार पीडित तरुणीला मागील एक वर्षापासून त्रास देत होता. मात्र, मुलीचा प्रेमाला विरोध होता. पीडित तरुणीने त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने आरोपीने तिला धमकी देखील होती. तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा, अशी धमकी आरोपीने पीडित तरुणीला दिली होती.

पीडित तरुणी शुक्रवारी (दि.9) सकाळी घराबाहेर पडली असता मुक्तार आणि त्याचा साथिदार शाहिद यांनी तरुणीला गाठले. त्यावेळी शाहिदने तरुणीला जबरदस्तीने पकडून ठेवले. मुक्तारने तरुणीचा नकाब खेचला व आपल्या हातातील चाकूने तिचे ओठांवर वार करुन ओठ कापले. यामध्ये मुलीच्या ओठांना गंभीर जखम झाल्याने तिला तातडीने शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मुलीची जखम मोठी असल्याने डॉक्टरांनी तिला केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या तरुणीवर उपचार सुरु असून पोलिसांनी आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया जाधव करीत आहेत.