पुणे विभाग भ्रष्टाचारात राज्यात अव्वल, नाशिक दुसऱ्या, तर अमरावती तृतीय स्थानावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी खात्यात भ्रष्टाचार खोलवर भिनला आहे. तो समूळ नष्ट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई केली जाते. तरीही भ्रष्टाचाराची किड काही कमी होताना दिसत नाही. पुणे परिक्षेत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti corruption bureau) यंदा भ्रष्टाचाराचे (Corruption) राज्यात सर्वाधिक 126 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये 183 आरोपींचा समावेश आहे. जगाच्या पाठीवर विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे विभाग राज्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत अव्वल ठरणे ही शोकांतिका आहे. तर भ्रष्टाचा-याच्या यादीत नाशिक व्दितीय क्रमांकावर असून त्या पाठोपाठ अमरावतीचा तिसरा क्रमांक लागतो.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 जानेवारी ते 17 नोव्हेंबर 2020 या काळातील आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत विभागाने राज्यभरात भ्रष्टाचाराच्या 579 प्रकरणात कारवाई केली. त्यात सापळ्याच्या 548 अपसंपदाच्या 10 तर, अन्य भ्रष्टाचाराच्या 21प्रकरणांचा समावेश आहे. यामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे परिक्षेत्रात सापळ्याच्या 123 (आरोपी-174), अपसंपदाच्या 1 (आरोपी-4) तर, अन्य भ्रष्टाचाराच्या २ (आरोपी-5) प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक परिक्षेत्र दुस-या स्थानावर असून, या परिक्षेत्रात सापळा प्रकरणात 85 (आरोपी-107 ) व अपसंपदा प्रकरणात 3 (आरोपी-6) असे 88 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात 113 आरोपींचा समावेश आहे. याशिवाय सापळा प्रकरणातील75 व अन्य भ्रष्टाचारातील 9 प्रकरणे मिळून दाखल 84 गुन्ह्यांसह अमरावती परिक्षेत्र तृतीय स्थानावर आहे. हे गुन्हे 169 (सापळा-104, अन्य भ्रष्टाचार-65) आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.