Solapur News : सिध्देश्वर मंदिर परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा १२ ते १६ जानेवारीदरम्यान होणारी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज (Siddheshwar Mandir) यांची गड्डा यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रमापूर्ती करण्याचे निर्देश, पुणे विभागीय आयुक्तांनी दिले. यात्राकाळात श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर व नंदीध्वज मार्गावर जमावबंदीचे (Curfew) आदेश लागू केले जाणार असल्याची माहिती
रविवारी घेण्यात पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून प्रथा व परंपरेनुसार होईल. यात्रेत गर्दीवर प्रामुख्याने नियंत्रण असणार असल्याचे, जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.

सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व मानकरी यांच्यासोबत चर्चा करुन गर्दी टाळून यंदा यात्रा करण्यात येत आहे. यात्रा काळात परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडतील. मंदिर व परिसर व नंदीध्वज मिरवणूक मार्गावर सर्वसामान्य भाविकांना प्रवेश नसेल. यात्रा काळातील धार्मिक विधीचे पंच कमिटीकडून लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रा काळात भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, यात्रेदरम्यान जमावबंदी लागू असल्याने अन्य राज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना शहराबाहेरच थांबवण्यात येईल. त्यामुळे भाविकांनी यात्राकाळात शहरात येऊ नये. यासाठी शहर हद्द व परिसरात शहर व ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितलं, महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून, कोरोनाकाळात यात्रा कमिटी व मानकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भाविकांना यात्रेदरम्यान मंदिर परिसर व नंदीध्वज मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. यात्रेतील सर्व धार्मिक विधी व परंपरा नियम पाळून होतील. यात्रा कमिटी पदाधिकारी व मानकऱ्यांना यादी पाहून त्यांना सहभागी होण्यासाठी पास दिले जातील.

आदेश मान्य नाही

यात्रेबाबत महापालिका आयुक्तांनी काढलेल्या जी. आर नुसार एका नंदीध्वजामागे पाचजण मानकऱ्यांच्या उपस्थितीत नंदीध्वजाची विधिवत पूजा व उत्सव करणे शक्यच नाही. कोरोना कालावधी असला तरी धार्मिक कार्यक्रमासाठी आवश्यक सेवेकऱ्यांना परवानगी मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने मानकऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले. यामुळे प्रशासनाचे निर्णय मान्य नसल्याची भूमिका प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी घेतली.