पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ शहरात 10 दिवसांसाठी संचारबंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी यात्रा ८ ते १४ डिसेंबर यादरम्यान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता आळंदीत ६ ते १६ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उद्यापासून आळंदीसोबत परिसरातील गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस शहरात प्रवेश करता येणार नाही. यांदर्भात पिंपरीचे पोलिस उपायुक्त मंच्चाक इप्पर म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आळंदीतील कार्तिकी यात्रेबाबत पुण्यात एका बैठक घेतली. त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ६ डिसेंबर ते १४ डिसेंबर आळंदीसह परिसरातील गावांत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, पोलिसांनी पंढरपूरच्या धर्तीवर ही शिफारस केली होती.

केवळ २० वारकऱ्यांना परवानगी
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी यात्रा कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून ते कार्तिक वद्य त्रयोदशी १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यासाठी श्री विठ्ठल, संत नामदेव महाराज, संत पुंडलिक महाराज या तीन मानाच्या दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी वीस वारकऱ्यांसोबत आळंदीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. या तिन्ही मानाच्या दिंड्या ८ डिसेंबरला परिवहन महामंडळाने (एसटी) आळंदीत दाखल होतील.

तगडा पोलीस बंदोबस्त…
आळंदीकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक बंद केली जाणार आहे. उद्योग नगरीतील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून बायपासचा वापर केला जावा, असे निर्देश वाहतूक विभागाने दिले आहेत.