अमरावतीमध्ये एकाच दिवशी शिवसेनाच्या नेत्यासह 3 जणांचा खून, तणावाचे वातावरण

अमरावती : पोलिसनामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यात काल शिवसेनेच्या नेत्यासह तीन लोकांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना अशाप्रकारच्या हत्याकांडाने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. यानंतर परिसरात कर्फ्यू लावण्यात आला असून परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे.

दोन समुदायांमध्ये यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. काल दुपारी अमरावतीच्या परतवाडा येथे काल दुपारी साडेबाराच्या दरम्यान शिवसेना नेते श्यामा पहलवान नंदवंशी यांची चाकूने हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी समुदाय रस्त्यावर उतरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी त्यांचा एका स्थानिक युवकाशी वाद झाला होता.

त्यादिशेने पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर नंदवंशी यांच्या समर्थकांनी दुर्रानी चौहाहा आणि लक्कड बाजारमध्ये सैफ अली आणि अब्दुल अतीक अब्दुल रफीक या दोन व्यक्तींवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना त्या दोघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, एकाच दिवसात तीन हत्या झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून स्थानिकांनी काही ठिकाणी दगडफेक देखील केली. त्यामुळे पोलिसांनी अचलपूर, सरमसपुरा आणि फरवाडा या भागात कर्फ्यू लावला आहे. तसेच या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com