Cyclone Nisarga Live Updates : वादळी वार्‍यामुळे रायगडमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ बुधवारी (दि.3 जून) अलिबाग जवळच्या किनार्‍यावर धडकणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातील 11 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हात राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पाच तुकडया तर तटरक्षक दल आणि नागरी सुरक्षा दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी किनारपट्टीवरील भागात वीज पुरवठाही खंडीत केला जाणार आहे.

निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी हरिहरेश्वर येथे धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु हे वादळ आता अलिबागच्या दिशेने सरकले आहे. बुधवारी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान हे चक्रीवादळ अलिबागच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी 90 ते 125 किमी असणार आहे. यावेळी किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिकांना समुद्र किनार्‍यांवर जाण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. मच्छीमारांना मासेमारीला जाण्यास बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तीन पथके अलिबागमध्ये तैनात करण्यात आली आहेत. श्रीवर्धल येथे एनडीआरएफचे 2 पथक. मुरूड येथे तटरक्षक दलाचे 1 पथक, उरण सेथे नागरी सुरक्षा दलाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. किनारपट्टीवर चार नगरपालिका आणि 62 गावांना या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सुमारे 1 लाख 73 हजार लोक राहतात. त्या सर्वाना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीची उपाय योजना म्हणून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, श्रीवर्धन, मुरूड या तालुक्यांमधील कोळी वाडयांमधील कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.