यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन –  गेल्या काही दिवसांपासन यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश गुरुवारी (दि. 18) दिले आहेत.

जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यात बाजारपेठेची वेळ रात्री 8 पर्यंत केली आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र येण्यावर बंदी आहे. धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका आदीकरीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मिरवणूक, रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

काय आहेत नियम

जिल्ह्यातील फक्त नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस 28 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. खासगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क, फेसकव्हर घालून असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. रेस्टॉरंट, हॉटेल सकाळी आठ ते रात्री 9.30 वाजता पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सायंकाळी पाच वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

तसेच नागरिकांना मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशाचे उल्लंघन करणे महागात पडणार आहे. संबंधित व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 व्यक्तींच्या मर्यादेत संख्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सदर आदेश शुक्रवारी (ता. 19) मध्यरात्री पासून लागू होणार आहेत.