नोटांमुळे ‘कोरोना’ पसरतो ? ‘घाबरलेल्या’ दुकानदारांनी मोदी ‘सरकार’कडे केली ‘ही’ मोठी ‘मागणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने देशात शिरकाव केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल दोन महिने बंद असलेले सगळे व्यवहार खुले करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने गर्दी वाढत आहे. लॉकडाऊननंतर दोन महिन्यांनी दुकाने खुली होत असताना बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंता निर्माण झाली आहे, ती म्हणजे नोटांबद्दल.

दोन महिने व्यापार बंद असल्याने बाजारातील चलन बंद होते. आता सरकारने सर्व व्यवहार खुले केल्याने ग्राहकांची बाजार पेठेतील गर्दी वाढत आहे. बाजार येणाऱ्या नोटा या अनेकांच्या हातातून जात असल्यामुळे व्यापाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का ? अशी शंका अनेक व्यापाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटांमुळे व्हायरस पसरतो किंवा काय याबद्दल सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी व्यापारी संघटनांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

या बाबतचं पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पाठवण्यात आलं आहे. नोटांमुळे व्हायरस पसरतो अशा प्रकारची माहिती पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे स्पष्ट करा अशी विनंतीही त्यांनी आरोग्य मंत्रालयाला केली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने 70 दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. त्या दरम्यान अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. अनेक कंपन्यांची कामं रखडली. काही कंपन्यांनी पगारात कपात केली तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार देखील दिलेले नाहीत. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणालाही कामावरून काढू नये आणि पगारात कपात करू नये, असे आवाहन करून देखील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं किंवा त्यांचे पगार दिलेले नाहीत. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यानचे कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध येत्या 12 जूनपर्यंत कारवाई करू नये, असे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत.