पवार कुटुंबातील सध्याचा वाद तात्पुरता, तो घरातच बसून मिटवला जाऊ शकतो : राजेश टोपे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पार्थ पवार हे माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. त्यांच्यातील सध्याचा विषय हा तात्पुरता विषय आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. पार्थ पवार हे वारंवार पक्षविरोधी भूमिका मांडत आहेत. त्यावर टोपे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर सविस्तर बोललो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी काळात पुण्याची स्थिती बदलेल

गेल्या काही दिवसातील अहवालानुसार कोरोना बादितांच्या वाढत्या संख्येत हळूहळू बदल होतो आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार मिळावेत यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याची स्थिती नक्की बदलेल असा विश्वास आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

खासगी रुग्णालयांवर कारवाईसाठी अधिकारी नियुक्त

जे खासगी रग्णालये कोरोना बाधितांच्या उपचारासाठी अवास्तव बिले लादत आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी विशेष प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीचे बील स्वीकारणाऱ्या रुग्णालयांवर आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे पूर्ण आदेश दिले असल्याची माहिती, टोपे यांनी दिली.

नियमांच पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा

पुणे शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदाच्या वर्षी आपल्यावर कोरोनाचे संकट असल्याने आपण जबाबदारीपूर्वक वागणे गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षी साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी पुणेकरांना केले आहे.