अभ्यासक्रम कमी झाला, पण विकलेल्या पुस्तकांचे करायचे काय ?

पोलिसनामा ऑनलाईन – सरकारने आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि तासिकांमध्ये कपात करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी याचा आधीच अंदाज घेत पुस्तकांची विक्री केली आहे. पालकांना संदेश पाठवून पूर्ण अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची विक्री करत आर्थिक हेतू साध्य केला असता. मात्र, आता या विकत घेतलेल्या पुस्तकांचे काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून राज्यातही सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा स्थितीत देशात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्याची सरकारची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. मात्र, सरकार अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार करत असले तरी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी खासगी शाळांनी पालकांना संदेश पाठवून पुस्तकांची विक्री केली आहे. ही पुस्तके संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्याने अभ्यासक्रम कमी झाल्यास या विकत घेतलेल्या पुस्तकांचे करायचे काय? असा प्रश्न पालकांसमोर आहे. खासगी शाळांनी पुस्तकांचाही व्यवसाय सुरू केला आहे.