पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३५ लाखाचं ‘रियाल’ हे ‘परकीय’ चलन जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विमानातून बेकायदेशीररीत्या परदेशी चलन घेऊन जाणाऱ्या दोघांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३५ लाख ४६ हजार रुपयांचे सौदी अरेबिया येथील ‘रियाल’ हे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. बालाजी मुस्तापुरे आणि मयुर भास्कर पाटील असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

बालाजी आणि मयुर हे स्पाईस जेटच्या विमानाने दुबईला जात होते. त्यावेळी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी दोघांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे सौदी अरेबियाचे चलन आढळून आले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यामध्ये ३५ लाख ४१ हजार रुपयांचे रियाल आढळून आले. दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हे चलन आपले नसून दुबईमधील कोणाला तरी देण्यास सांगितले असल्याचे सांगितले.

बालाजी आणि मयुर या दोघांवर कस्टम कायद्यानुसार गुन्हा दाखल करून परकीय चलन जप्त केले आहे. ही कारवाई पुणे सीमा शुल्क विभागाच्या उपायुक्त उषा भोयरे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा शुल्क अधिकारी विनिता पुसदेकर आणि संजय झरेकर यांच्या पथकाने केली.