तलवारीने केक कापल्याने शिवसेनेच्या पिंपरीतील ‘त्या’ नेत्यावर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा मुळशी तालुक्याच्या माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी चांदेरे यांचा वाढदिवस होता. दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळ वाढदिवस साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या राहत्या घराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांसमोर चांदेरे यांनी तलवारीने केक कापला. त्याची व्हीडीओ क्लीप पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरून सहायक पोलीस फौजदार आर. एम. भालचिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब चांदेरे यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी करत आहेत.

या संदर्भात पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता असा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगत माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली.