राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ६६ पदकांची कमाई

गोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था
भारताने यंदाच्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत २०१८ मध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ६६ पदकांची कमाई केली. ग्लास्गो येथे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६४ पदके मिळविली त्या तुलनेत यंदा भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.

गोल्ड कोस्टमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर मँचेस्टर येथील स्पर्धेत २००२मध्ये ६९ पदके मिळवली होती.

नेमबाजीतील यश
भारताने यावेळी ७ सुवर्ण पदकांसह १६ पदके कमावली. अनिश भानवाला, मेहुली घोष आणि मनू भाकर यांसारख्या तरुण नेमबाजांशिवाय हिना सिद्धू, जितू राय आणि तेजस्विनी सावंत यांसारख्या नेमबाजांनीही भारताला हे यश मिळवून दिले.

वेटलिफ्टिंगमधील यश
भारताने एकूण ९ पदके कमावली. यामध्ये ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
मीराबाई चानू, संजीता चानू यांनी भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली. त्याशिवाय पूनम यादवने देखील भारतासाठी सुवर्ण जिंकले.

कुस्तीतील वर्चस्व
या क्रीडा प्रकारातही भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. भारताने ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण १२ पदके कमावली.
बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक, सुमित या पहलवानांनी आपापल्या वजनी गटात भारताला पदके मिळवून दिली.

बॅडमिंटन
या क्रीडा प्रकारात भारताने एकूण ६ पदके मिळविली. भारताने मिश्र प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तसेच महिला एकेरीमध्ये सायना नेहवालने भारताच्याच पी. व्ही. सिंधूला हरवत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तर पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांला अंतिम फेरीत ऑलंपिक रौप्य पदक विजेता मलेशियाचा खेळाडू के. ली. चेंग वेईने धोबीपछाड दिली.

टेबल टेनिस
भारतीय महिला आणि पुरुषांच्या संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. त्याचबरोबर महिलांच्या एकेरीमध्ये मणिका बत्राने सुवर्ण जिंकले.
तर पुरुष एकेरी आणि महिला एकेरीच्या स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळाले.

बॉक्सिंग
भारताने एकूण ९ पदके पटकावली. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य तर ३ कांस्य पदके जिंकली.
यामध्ये मेरी कोमने सुवर्ण जिंकून दाखवले की, यश मिळविण्यासाठी वय महत्वाचे नाही.