पिंपरी महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला; बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला झाला आहे. अज्ञाताने 27 सर्व्हर आणि डेटा इनक्रिप्ट करून पाच कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच हा डेटा परत हवा असेल तर पैशांची मागणी करण्यात आली आहे. ती रक्कम बिटकॉइन स्वरूपात देण्याची अट घालण्यात आली आहे. रन्समवेअर अटॅक केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा प्रकार 26 फेब्रुवारी रोजी घडला असून, मंगळवारी (दि.9) या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला हा परदेशातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच रेकी करून हा हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. निगडी येथील अस्तित्व हॉल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाची नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पूर्ण कामाला सुरुवात केली नव्हती. सॉफ्टवेअर लॉन्च करण्याच्या अगोदरच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरमधून डेटा इनक्रिप्ट केला असल्याची माहिती समोर आली आहे.

या सायबर हल्ल्यात 5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच चोरी झालेला डेटा परत मिळवला जाऊ शकतो, असे सायबर पोलिसांनी सांगितले. हॅकरने हा डेटा इनक्रिप्ट केला असून, तो पुन्हा त्यांनाच डिस्क्रिप्ट करता येतो. त्यामुळे ते बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिली असून, अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागाने दिली.