पुण्यातील कंपनीवर सायबर अटॅक, कामकाज ठप्प

पिंपरीः पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका नामाकिंत कंपनीवर हॅकरने सायबर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या संगणकीय प्रणालीत प्रवेश करून कामकाजाचा पासवर्ड बदलला आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज ठप्प झाले आहे. बाणेरच्या किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या यमुना बिल्डिंग मधील कार्यालयात 18 एप्रिलला ही घटना घडली आहे. या प्रकरणी 6 मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कंपनीतील माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील अंबादास खानझोडे (रा.विजयानगर कॉलनी पुणे) यांनी 2 दिवसापूर्वी हिंजवडी पोलीसात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही 18 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजून 3 मिनिट ते 9 वाजून 21 मिनिट दरम्यान घडली आहे. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाने 6 मे रोजी तक्रार केली आहे. हॅकरने पब्लिक आयपी अड्रेसचा वापर करीत कंपनीच्या व्हीपीएन युझरचा वापर करून संगणकीय प्रणालीत प्रवेश केला आहे. त्यानंतर कंपनीच्या नेटवर्क स्विचपोर्ट मधील सुपर ऍडमिनच्या खात्यात प्रवेश केला आहे. नेटवर्क स्विच पोर्टमध्ये जाऊन ते बंद केले. त्याच बरोबर कंपनीच्या सुपर ऍडमीनचा पासवर्ड बदलला. त्यामुळे कंपनीच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील कामकाज बंद पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.