बँक मॅनेजर असल्याचं सांगून लोकांची फसवणूक, टोळी गजाआड

भोपाळ : पोलिसनामा ऑनलाईन – सणासुदीच्या या दिवसांत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मध्य प्रदेशात बँक मॅनेजर असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली जात होती. अशी फसवणूक करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

भोपाळमधील आर. बी. अग्रवाल यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बँक मॅनेजर बोलत आहे, केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून त्यांच्या फोनवर आलेला ओटीपी क्रमांक त्यांच्याकडे मागितला आणि तो वापरून त्यांच्या बँक खात्यातील 43 हजार रुपये काढून फसवणूक केली.

पोलिसांनी या गुन्ह्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये आरोपी बिहारमधील असून त्याने घरात बसून ही फसवणूक केली होती असं लक्षात आलं. नरेश यादव असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अशा पद्धतीने करत होता फसवणूक
या आरोपीची एक टोळी असल्याचे तपासात समोर आले. ते लोकांना फोन करून आपण बँकेतून मॅनेजर बोलत असल्याचं खोटं सांगत. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बँक खात्याचं केवायसी पूर्ण करण्यासाठी माहिती हवी आहे असं सांगायचे. जर तुम्ही खात्याची केवायसी केली नाही तर ते बंद होईल हे पटवून देत असत. त्यामुळे अनेकजण घाबरून आपली सर्व माहिती त्यांना देत. त्यानंतर आरोपी त्यांचे डेबिट कार्ड नंबर, सीवीवी नंबर आणि ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असत.