दलित असल्याने नाकारली मदत ; मुलाने सायकलवरून नेला आईचा मृतदेह

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशातील करपाबाहाल गावात जाती व्यवस्थेमुळे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खालच्या जातीची असल्याने महिलेच्या अंतसंस्कारासाठी मदत नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओडिशातील करपाबाहाल गावात जानकी सिन्हानिया या नावाची महिला आपल्या सरोज सिन्हानिया या १७ वर्षीय मुलासोबत राहत होत्या. दरम्यान जानकी पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता तिथे पाय घसरून त्या पडल्या. त्यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचा १७ वर्षीय मुलगा आईचे अंतसंस्कार करण्यासाठी शेजारी राहत असणाऱ्यांना मदत मागण्यासाठी गेला, मात्र ते कनिष्ठ जातीतील असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांची मदत नाकारली. त्यावेळी १७ वर्षीय सरोजने आईचा मृतदेह अंतसंस्कारासाठी घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत सायकलवरुन नेला. दरम्यान तेथील जंगलामध्ये मृतदेहाचे दफन केले.