Video : ‘फनी’ग्रस्त भागाची मोदींकडून हवाई पाहणी ; १००० कोटींची देणार मदत

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशात थैमान घातलेल्या फनीग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राज्यपाल गणेशी लाल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ही पाहणी केल्यानंतर फनीग्रस्त भागाला १००० कोटी रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

फनीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांशी बोलताना म्हणाले की “नवीन पटनायक यांनी खूप चांगली योजना तयार केली आहे. यावेळी पटनायक यांच्या योजनेला सरकारची सहमती असल्याचे मोदींनी सांगितले. ते म्हणाले नवीन पटनाईक यांनी केलेल्या योज़नांमध्ये भारत सरकार त्यांच्यासोबत राहून पावले उचलणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संवाद खूप चांगला होता. मी देखील यावर देखरेख ठेवत होतो. ओडिशाचे लोक सरकारच्या प्रत्येक निर्देशांचे पालन करतात ते प्रशंसनीय आहे” असे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सांगितले.

फनीग्रस्त भागाला १००० कोटी रुपयांची मदत

यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फनीग्रस्त भागाला १००० कोटी रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले “नुकतीच भारत सरकारने ३८१ कोटी रुपयांची घोषणा केली होती, आता १००० कोटी रुपयांची मदत केली जाईल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

फनीचा हाहाकार …

विनाशकारी ‘फनी’ चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार धडक देत हाहाकार माजवला होता. या वादळामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. या वादळाचा पश्चिम बंगालमध्येही देखील धोका निर्माण झाला होता. मात्र पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या वादळाची तीव्रता कमी झाली. वादळामुळे सुमारे १० हजार गावांत नुकसान झाले.

या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशातील पुरी जिल्ह्याला बसला. राजधानी भुवनेश्‍वरही वादळात सापडले होते. वादळी पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक घरे उद्‌ध्वस्त झाली. या वादळामुळे विद्युत आणि दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या प्रादेशिक वादळ प्रणालीने मोठे नुकसान रोखण्यासाठी मदत केली.