फिलीपिन्समध्ये चक्रीयवादळ ‘गोनी’मुळे 10 लोकांचा मृत्यू, ‘या’ वर्षी आलेली 18 वी ‘आपत्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिलिपिन्समधील लुझोन बेटाच्या बिकोल प्रदेशात ‘गोनी’ चक्रीयवादळामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण बेपत्ता आहेत. फिलिपाइन्सच्या नागरी संरक्षण विभागाच्या कार्यालयाने (ओसीडी) ही माहिती दिली.

ओबीडीने सांगितले की गंभीरपणे बाधित झालेल्या अल्बे प्रांतात नऊ जणांचा मृत्यू झाला तर कटानडुआनेस प्रांतात एकाचा मृत्यू झाला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ‘गोनी’ वादळाचे 225-310 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहिले. हे चक्रीवादळ रविवारी पहाटे 4:50 वाजता लुझोन बेटावर पोहचले.

ओसीडीनुसार वादळाच्या पार्श्वभूमीवर 3.90 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 3.45 लाखापेक्षा जास्त लोक सरकारी सुविधांमध्ये राहत आहेत.

वादळामुळे बिकाल प्रदेशात पूर आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

फिलिपाईन्समधील 17 पैकी 12 भागात वादळाचा परिणाम झाला आहे. ‘गोनी’ काही तासांनी पश्चिमेकडील लुझोन भागातही गेला. हे क्विझोन प्रांत आणि मनिला मार्गे देखील जाईल. वादळ मनिला गाठल्यामुळे कमी तीव्र होण्याची शक्यता आहे. यानंतर ते दक्षिण चीन समुद्राकडे वळेल.

‘गोनी’ हे यावर्षी फिलिपिन्समध्ये दाखल होणारे 18 वे चक्रीयवादळ आहे. विशेष म्हणजे फिलिपिन्समध्ये दरवर्षी जून ते डिसेंबर या कालावधीत अनेक चक्रीयवादळे येतात आणि शेकडो मृत्यू आणि अब्जावधी डॉलर्सचे मालमत्तेचे नुकसान करतात.