गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीजवळ आज सायंकाळी येणार ‘तैक्ते’चक्रीवादळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लक्षद्वीपजवळ अरबी समुदातील कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘तैक्ते’ चक्रीवादळात आज रुपांतर झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ लक्षद्वीपमधील अमिनी दिवी पासून १२० किमी, केरळमधील कोन्नूरपासून ३०० किमी आणि गुजरातमधील वेरावळपासून ९९० किमी दूर आहे. हे चक्रीवादळ गेल्या ६ तासापासून ताशी ७ किमी वेगाने पुढे सरकत आहे. ते आज सायंकाळी गोवा, सिंधुदुर्गच्या जवळ येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा मार्ग थोडा बदलून ते कोकणापासून दूर समुद्रात जाऊन तेथून ते गुजरातमधील वेरावळ किनारपट्टीला १८ मे रोजी धडकण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे चक्रीवादळ दक्षिण गोवा व कोकण किनारपट्टीपासून १५० ते २०० किमी दूर समुद्रातून पुढे जाणार असले तरी त्याच्या केंद्राभोवती फिरणार्‍या वार्‍यांचा आणि पावसाच्या ढगांचा घेरा दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून पुढे जाताना आज रात्री या चक्रीवादळातील वार्‍यांचा वेग ताशी ११० ते १२० किमी राहणार आहे. रविवारी सकाळी या चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांचे (एनडीआरएफ) ५३ पथके तैनात करण्यात आली आहेत.

या चक्रीवादळाचा परिणाम आज कोकणच्या किनारपट्टीवर दिसू लागला आहे. क़ोकणातील किनारपट्टीवर लाटा धडकण्याचा वेग वाढला आहे. किनारपट्टीजवळील सर्व गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे. कच्च्या घरात राहणार्‍यांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यास सांगण्यात येत आहे. गावागावांमध्ये स्पिकरवरुन सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सध्या कोकणातील सर्व जिल्ह्यांमधील किनारपट्टीवरील दक्षता वाढविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून गेलेल्या २५६ बोटी अजून समुद्रात आहेत. पालघरच्या सातपाटी, डहाणू व वसई बंदातील १८७ बोटी समुद्रात गेल्या आहेत. त्यात अजून परतलेल्या नाहीत. तटरक्षक दलाच्या गस्त घालणार्‍या बोटीतून सर्व मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून समुद्रात असलेल्या मच्छीमारांना किनार्‍यावर परतण्यास सांगण्यात आले आहे.