CM ठाकरेंची मोठी घोषणा ! चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई जाहीर

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यात तोक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. वादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाला काय मदत जाहीर करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर नुकसानग्रस्त भागात निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल आणि कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने अनेक गावात शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. कोकणात किती प्रमाणात नुकसान झाले याबद्दलचा अहवाल कोकण विभागाने सोमवारी सादर केला आहे. एकूण 47 कोटी 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तौक्ते वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. याचे नुकसान हे सर्वाधिक 25 कोटी इतके आहे. तर शेतीचे 16 कोटी 88 लाखांचे नुकसान झाले आहे.
मनुष्य हानी – 41 लाख, पशुधन – 6 लाख, घरगुती वस्तू नुकसान 11 लाख, घरांची पडझड – 25 कोटी, जनावराचे गोठे 34 लाख, मत्सा व्यवस्थित – 4 कोटी 84 लाख, शेती नुकसान – 16 कोटी 48 लाख अशा प्रकारे एकूण 47 कोटी 15 लाखांचे नुकसान झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, पालघर ठाणे सर्व मिळून ही मागणी केली आहे.