PM नरेंद्र मोदी आज देणार गुजरात, दीव ला भेट; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार पहाणी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरात आणि दीव येथे भेट देणार असून ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊ वाजता नवी दिल्लीहून रवाना होतील. ते भावनगरला उतरतील. तेथून ते उना, दीव, जाफराबाद आणि महुवा या परिसराची हवाई पहाणी करतील. त्यानंतर ते पुढे अहमदाबाद येथे जातील.

तेथे ते आढावा बैठक घेणार आहेत. गेल्या अनेक दशकातील सर्वात मोठा फटका या चक्रीवादळाने गुजरातला बसला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यु झाल्याचे आढळून आले आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या चक्रीवादळाने १६ हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले. ४० हजारांहून अधिक झाडे पडली असून १ हजारांहून अधिक विजेचे खांब कोसळले असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितले.
हवामान विभागाच्या इशार्‍यानंतर किनारपट्टी परिसरात राहणार्‍या १ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते.