चक्रीवादळग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी : देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण, पुणे, नाशिक, मालेगांव येथे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन चक्रीवादळग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात विशेषतः कोकणातील जिल्हयांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, मासेमार, फलोत्पादक, मूर्तीकार, छोटे दुकानदार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने घरांचे आणि घरांमधील सामुग्रीचे नुकसान झाले आहे. पुणे, नाशिक, मालेगांव येथेही वादळामुळे नुकसान झाले आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी आधीच त्रस्त आहेत. आता प्रत्यक्ष हंगाम तोंडावर आलेला आहे त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ होण्याची गरज असून तातडीने नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.