बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ! तामिळनाडु, पॉडेचरीला चक्रवादळाचा इशारा ; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे तामिळनाडु, पॉडेचरी यांना धोक्याचा इशारा दिला आहे. तर रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सोमवारी वर्तवली आहे.

कमी दाबाचे पट्टे सोमवारी सकाळी पाँडेचरीपासून 600 किमी तर चिन्न्ईपासून 630 किमी दूर होते. मंगळवारी पहाटे त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. 25 नोव्हेंबरला ते कराईकल आणि ममालीपूरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम 26 नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडु, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा परिसरात 24 ते 26 नोव्हेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात तीन दिवस पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या ब-याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. 25 नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 27 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. 26 नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 27 नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात 26 नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.