काही वेळात किनारपट्टीवर धडकणार ‘यास’ चक्रीवादळ; 19 लाख लोकांना हलविले, कोलकत्ता विमानतळ बंद

कोलकत्ता : वृत्त संस्था – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळ आता अति तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाले असून ते काही वेळात पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागातील सुमारे १९ लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या १०९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोलकत्ता विमानतळ आज दिवसभर बंद ठेवण्यात आले असून तेथे मदतीसाठी सैनिकांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी साडेपाच वाजता हे चक्रीवादळ ओडिशातील बालासोरपासून ९० किमी, धर्मा पोर्टपासून ४० किमी दूर आहे. येत्या काही तासात ते पारादीप ते बालासोर दरम्यान किनारपट्टीला धडकणार आहे. यावेळी किनारपट्टीवर १५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

ओडिशा सरकारने किनारपट्टी परिसरातील १४ लाख नागरिकांना तसेच पश्चिम बंगालने ५ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ४० घराचे आतापर्यंत नुकसान झाले असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. त्या आज रात्रभर मंत्रालयातील नियंत्रण कक्षात थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहे. ‘यास’ चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल, ओडिशासह पाच राज्यांना फटका बसण्याची शक्यता असून आतापासून पुढील १२ तास महत्वाची ठरणार आहे. ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये जाणार्‍या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.