‘कोरोना’ची लागण झाल्यास सरकार उचलणार पूर्ण खर्च, ‘या’ देशात पर्यटकांना ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आणि कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता अनेक देशांमध्ये अद्यापही लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र, आता परिस्थिती हळूहळू रुळावर आणण्याचा बहुतांश देशांकडून प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. यानुसार कित्येक देशांमध्ये लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही देशांकडून वेगवेगळ्या विशेष ऑफर्स दिल्या जात आहेत.

युरोपियन देश सायप्रसने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देण्याची सुरुवात केली आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सायप्रसने पर्यटकांसाठी विशेष ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, जर एखाद्या पर्यटकाला त्यांच्या देशात कोरोनाची लागण झाली तर त्या पर्यटकाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार करेल.

यावेळी कोरोना रुग्णाचा येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, हॉटेलमध्ये राहण्याचे बिल आणि औषधांसह खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च सरकार करेल. सायप्रस परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांच्या देशातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये आणि सुरक्षित रहावे अशी आमची इच्छा आहे. एका अहवालानुसार, सायप्रसच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी 15 टक्के हिस्सा पर्यटन क्षेत्रातून येतो.

नुकत्याच आलेल्या अहवालात सायप्रसच्या सरकारने असा दावा केला आहे की, त्यांच्या देशात कोरोना विषाणूचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. यापूर्वी देशात 1000 पेक्षा कमी लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यापैकी 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. सायप्रसनंतर हळूहळू इतर अनेक देश पर्यटनावरील निर्बंध हटवण्याचा विचार करत आहेत.