सायटोकाईन स्टॉर्मनेही होऊ शकतो कोरोनाबाधिताचा मृत्यू; जाणून घ्या काय आहे ही अवस्था

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शन यांसारख्या आरोग्य सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. आत्तापर्यंत लाखो रुग्णांचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे.

सध्या सायटोकाईन स्टॉर्ममुळेही अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू होऊ शकतो. पण हे स्टॉर्म म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, ‘जेव्हा कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरातील अवयव काम करणे बंद करतात त्यानंतर रुग्णाचा मृत्यू होतो. त्याच अवस्थेला मेडिकल सायन्समध्ये सायटोकाईन स्टॉर्म म्हटले जाते’.

शरीरात केव्हा तयार होतो सायटोकाईन स्टॉर्म?

जेव्हा शरीरात संक्रमित करणारा व्हायरस इम्यून सिस्टिमवर अशाप्रकारे हल्ला करतो तेव्हा अनियंत्रितपणे सायटोकाईन तयार होऊ लागतो. मोठ्या प्रमाणात तयार झालेला सायटोकाईन पेशींवर हल्ला करतो. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम करतो आणि अवयव काम करणे बंद होते. अशाप्रकारे इम्यून सिस्टिमच शरीराचा शत्रू बनतो. सायटोकाईन हा थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते.

शरीरावर धोकादायक परिणाम

सायटोकाईनमुळे शरीरातील धमन्या फुगतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येतो. नसांमध्ये रक्त जमा होणे थ्रोम्बोसिसही असू शकतो. कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरात अशाप्रकारे संक्रमण दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असते. त्यामध्ये रुग्णाला स्टेरॉईडही देणे गरजेचे असते. तसेच दुसऱ्या आठवड्यात रुग्णाला प्रकृतीकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होत असेल तर त्वरीत डॉक्टरांना याची माहिती द्यायला हवी. सायटोकाईन स्टॉर्म जीवघेणा होऊ शकतो. कोरोनाबाधित अनेक रुग्णाच्या मृत्यूमागे हेही एक कारण असू शकते. अशा रुग्णाच्या शरीरात सायटोकाईन स्टॉर्म आढळल्यास रुग्णाची प्रकृती नाजूक होते.