DSK यांना ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या मुलीच्या तेराव्याला जाण्याची कोर्टाची परवानगी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि सध्या 2 हजार कोटीच्या घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले डी.एस कुलकर्णी यांच्या मुलीचे कोरोनामुळे मृत्यू झाला. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा देखील कारागृहात असल्याने त्यांना कोणालाही अंत्यसंस्काला उपस्थित राहता येऊ शकले नाही. आता न्यायालयाने या तिघांना मुलीच्या तेराव्यासाठी काही तास घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
डी.एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळ्याने त्यांचा मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधामुळे अंत्यसंस्कारासाठी कारागृहात असलेल्या कुलकर्णी यांना हजर राहता आले नाही.
कुलकर्णी दाम्पत्याला मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी जाण्याची परवानगी मिळाली नाही. किमान तेराव्याच्या विधीसाठी सूट मिळावी यासाठी डीएसके यांच्या वकिलाने कोर्टात अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे त्यांना 16 ऑगस्टला मुलीच्या तेराव्याच्या विधीला हजर राहता येणार आहे. न्यायालयाने विनंती अर्ज मान्य करताना काही तासांसाठी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.