दाभोलकर हत्या प्रकरण : संजीव पुनाळेकर आणि भावे या दोघांना न्यायालयीन कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने अटक करण्यात आलेल्या वकिल संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांची रवानगी न्यायालयाने न्यायलयीन कोठडीत केली आहे. तर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे.

१ जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी दोघांच्या सीबीआय़ कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

पुनाळेकर आणि भावे हे दोघेही माठ्या कटात सामील होते.. यापुर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुनाळेकर यांनी पिस्तूल नष्ट करण्यचा सल्ला दिला तर भावे याने रेकी करून ओळखण्यास मदत केली. त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असून पुनाळेकरकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील डाटाचे विश्लेषण करायचे आहे. त्यासाठी अतिरिक्त १४ दिवसांची अतिरिक्त सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिल सुर्यवंशी यांनी केली.

तर आतापर्यंत सादर केलेल्या तिन्ही रिमांड रिपोर्टमध्ये सीबीआयकडून दाखवलेली कारणे सारखीच आहेत. सीबीआयने कोणत्याही नवीन मुद्द्यावर तपास केला नाही. कोठडीचे मुद्देदेखील त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे नवीन कारण काही नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

त्यानंतर न्यायालयात सीबीआयने एक गुप्त अहवाल सादर केला आहे. न्यायालयाने दोघांनाही ४ जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी दिले आहेत.