सांगली : मोक्यातील फरारी अट्टल दरोडेखोर मुक्या पवारला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात दरोड्यासह खुनाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला, मोक्यातील फरारी अट्टल दरोडेखोर मुक्या ऊर्फ विशाल भिमराव पवार (वय २५, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) याला अटक करण्यात आली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काळमवाडीत शुक्रवारी ही कारवाई केली. ऑक्टोबर २०१७ मध्ये तो पोलिसांच्या ताब्यात असताना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मुक्याला अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिले होते. पिंगळे यांनी त्याच्या शोधासाठी एक विशेष पथक तयार केले होते. पथकाने सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर आदी जिल्ह्यात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नव्हता. मुक्या काही दिवसांपासून काळमवाडीत रहात असल्याची माहिती निरीक्षक पिंगळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.शुक्रवारी पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.

२०१७ मध्ये त्याने साथीदारांसह कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे दरोडा टाकला होता. त्यावेळी दाम्पत्यावर त्यांनी हल्ला केला होता. त्यात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी बेडीतून हात सोडवून तो पळून गेला होता. फरार झाल्यानंतर त्याने सांगली, सातारा जिल्ह्यात दरोडे टाकले. सांगली जिल्ह्यातील शिरसी, तुजारपूर येथे तर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे त्याने साथीदारांसमवेत दरोडे टाकल्याचे स्पष्ट झाले होते.

त्याच्यासह टोळीवर सांगली, सातारा येथे मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आल्यापासून तो फरारी होता. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अधीक्षक शर्मा, निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, साईनाथ ठाकूर, युवराज पाटील, संदीप गुरव, बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –