डॅडी अरुण गवळी बनला मुन्नाभाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

लगे रहो मुन्नाभाई चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेल. भाईगिरी करणाऱ्या मुन्नावर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे आपण पाहिले आहे. या चित्रपटामुळे संजय दत्तची प्रत्यक्षातील प्रतिमा सुधारण्यास मोठी मदत झाली होती. पण हे आता केवळ चित्रपटापुरते मर्यादित राहिले नाही तर ते नागपूर कारागृहात प्रत्यक्षात आले आहे. होय, एकेकाळी मुंबईसह ठाणे, पुण्यात दहशत निर्माण केलेल्या आणि डॅडी म्हणून सर्वपरिचित झालेल्या अरुण गवळी हा गांधी विचारांच्या परिक्षेत टॉपर ठरला आहे. नागपूर कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परिक्षेत त्याने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.

आजवर अनेक गुन्ह्यांच्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्यानंतर आपण गुन्हेगारी सोडल्याचे सांगत अरुण गवळी याने राजकीय पक्षाची स्थापना केली. एकदा आमदार म्हणून तो निवडूनही गेला. असे असले तरी पूर्वीच्या एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली व त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. सर्वांपासून दूर ठेवण्यासाठी त्याला नागपूरला हलविण्यात आले.

कारागृहात शिक्षणातून परिवर्तन घडविण्यासाठी गांधी विचार परीक्षेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दरवर्षी या कारागृहातील अनेक बंदिजन परीक्षा देतात. यावर्षीही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६० कैद्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तके पुरविण्यात आली. नागपूरच्या कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या डॉन अरुण गवळी यानेही ही परीक्षा दिली. त्याला पुरविलेल्या साहित्यातून गांधीजींचे विचार आत्मसात केले आणि ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत, याच विचारांची भीती इंग्रजांनाही होती. अरुण गवळी याचे व्यक्तिमत्त्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्याने दहशत निर्माण केली होती. आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचाराशी जुळला आहे. मात्र, परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे. चित्रपटात गांधी विचारांना आत्मसात करणारा मुन्नाभाई बदलला, असाच बदल अरुण गवळीत होणार का हे तो शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरच समजू शकेल.