‘अशी’ झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ‘स्थापना’, मु्र्तीसाठी ‘एवढा’ खर्च ! जाणून घ्या पूर्ण ‘इतिहास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन(कुमार चव्हाण) –   ही गोष्ट आहे 1893 सालची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ होते. बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत होती. त्यावेळी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ यांच्या मुलाचे देहावसान झाले. यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ दु:खात होते. यावेळी त्यांचे गुरू श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ऐतिहासिक परंपरा

यांनी त्यांना श्री दत्त महाराज आणि श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यास सांगितले व रोज त्याची पूजा करा असे म्हटले. जसे आपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते तसेच ही दोन दैवते तुमचं नाव उज्वल करतील. याचा सांभाळ तुम्ही मुलाप्रमाणे करा. यानंतर त्यांनी दत्त महाराजांची एक संगमरवरी तर गणपतीची मातीची मूर्ती बनवली होती. या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती. आज पुण्यातील गणपतींच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव आघाडीवर आहे.

सन 1896

लोकमान्य टिळकांनी 1894 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. यानंतर दगडूशेठ हलवाईची दुसरी मूर्ती 1896 साली तयार करण्यात आली. यानंतर त्या मुर्तीचा उत्सव होऊ लागला. याच काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु तेथील परिसरातील नागरिकांनी आणि तत्कालीन कार्यकर्त्यांनी ही गणेशोत्सवाची परंपरा सुरुच ठेवली. हा गणपती त्याकाळी कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहुलीचा हौद, सार्वजनिक गणपती अशा नावाने प्रचलित होता.

सन 1968 तयार केली नवीन मूर्ती

सन 1967 साली या गणपतीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. 1896 साली तयार केलेल्या या मुर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. यानंतर नवीन मूर्ती बनवण्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार नागेश शिल्पी यांना पाचारण केले गेले. नमुना म्हणून एक लहान मूर्ती बनवण्यात आली. यानंतर बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टरचा वापर करून पडद्यावरून कार्यकर्त्यांना ही मूर्ती दाखवली. आधीच्या मुर्तीशी ही मूर्ती मिळत आहे याची खात्री करत सर्वांच्या अनुमतीने नवीन मूर्ती तयार केली गेली. ही मूर्ती बनवण्यासाठी त्याकाळी 1125 रुपये (एक हजार एकशे पंचवीस रुपये) इतका खर्च आला होता.

1984 मध्ये मुर्तीची मंदिरात स्थापना तर 2002 साली भव्य मंदिर

यानंतर 1984 मधील गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर गणपतीची मंदिरात स्थापना करण्यात आली. त्यावेळी मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे आणि मामासाहेब रासने तसेच आप्पासाहेब सुर्यवंशी होते. यानंतर भाविकांसाठी मंदिर अपुरे पडू लागल्याने 2002 मध्ये भव्य मंदिर (जे आता आहे) उभारण्यात आले.

बिग बी आणि जया बच्चन यांनी गणपतीला अर्पण केले सोन्याचे कान

कुली सिनेमाच्या शुटींग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा मोठा अपघात झाला होता. यावेळी जया बच्चन दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी गणपतीला नवस केला. यानंतर ते सुखरूप बरे झाल्यानंतर त्यांनी गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले होते.

ट्रस्टतर्फे केली जाणारी काही कामे

मंदिराच्या ट्रस्टने नंतर गणेशोत्सव स्पर्धाही सुरु केली. याशिवाय गणेशोत्सवादरम्यान हजारो महिलांच्या सहभागाने अथर्वशीर्ष उपक्रम राबविला गेल्याचे जगभर माहीत आहे. खास बात म्हणजे ट्र्स्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पिगोरी (ता. पुरंदर) गावामध्ये जलसंधारणाची कामे ट्रस्टने यशस्वी केले आहेत. याशिवाय ससून रुग्णालयातील रुग्णांना ट्रस्टतर्फे उत्तम भोजनसेवाही दिली जात आहे. कोंढव्यात देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रमही चालवले जाते.