दगडूशेठ गणपती मंडळाच्या अध्यक्षांच्या पत्नीला तब्बल १ कोटी ६८ लाखांचा गंडा  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या पत्नीची तब्बल १ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे . सासऱ्यांच्या नावाने असलेला फंड खात्यात जमा करण्याच्या आमिषाने हा प्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्यावर शारदा अशोक गोडसे (५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात ३४ संस्थांच्या महिलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , २०१३ मध्ये शारदा यांना एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला ‘ तुमच्या सासऱ्यांच्या नावाने नऊ लाखांचा फंड आहे . तो तुमच्या खात्यात टाकायचा आहे ,’ असे त्या अनोळखी व्यक्तीकडून सांगण्यात आले . त्यानंतर खटल्यात रक्कम जमा करवून घेण्यासाठी त्यांना पॉलिसी आणि एनओसी काढावी लागेल तसेच इन्कम टॅक्स देखील भरावा लागेल, असे सांगून अशा अनेक कारणाने शारदा यांच्याकडून पैसे घेण्यात आले.  पैसे मिळायला सुरुवात झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने सुरुवातीला फंडाची रक्कम ९ लाख संगितली होती . ती आता १८ लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगून ३६ लाख फंड मिळणार असे आमिष देण्यात आले . असे काही ना काही बहाणे सांगत शारदा यांच्याकडून एकूण १ कोटी ६८ लाख रुपये घेण्यात आले.

खासगी बँकांच्या आवारात चालायची देवाण घेवाण

अज्ञात व्यक्तींनी आरटीजीएस , सोन्याच्या स्वरूपात , तर काही रोकड घेण्यात आली आहे . शहरातील काही खासगी बँकांच्या परिसरात त्यांना बोलावून पैसे घेण्यात आले . त्याठिकाणी पैसे घेऊन कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या . मात्र , त्यानंतरही त्यांच्या खात्यावर फंडाची सांगण्यात आलेली रक्कम मिळाली नाही . त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली . यात एकूण ३४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यामध्ये दिल्लीच्या काही संस्थांची नावे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे . या प्रकरणी उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी हे तपास करत आहेत . दरम्यान २०१३ पासून हा प्रकार सुरू आहे.

यातील बहुतांश आरोपी बाहेरील राज्यातील आहेत . त्यांचा शोध सुरू आहे . तसेच , आरोपींनी त्यांना शहरात बोलविल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासणी करण्यात येत आहे.