पुण्यात दिवसाला 12 ते 15 पोलिसांना होतेय कोरोनाची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत दररोज 12 ते 15 पोलीस कोरोनाबाधित होत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दीड महिन्यात 450 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 250 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 200 पोलीसांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. यात काही लस घेतलेल्या पोलिसांचाही समावेश आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून 1 वर्षात जवळपास 1450 पोलिसांना कोरोना झाला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा शहरात रुग्णसंख्या वाढू लागली. तसे पोलिस देखील कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढू लागले. कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढत असल्याने काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून दिल्या जात आहेत. लस न घेतलेल्यांनी लस घ्यावी, असे सूचित केेले आहे. शहरातील 95 टक्के पोलिसांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे, तर 20 टक्क्यांपेक्षा जास्त पोलिसांनी दुसरा डोस घेतला आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.