उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर चौक दरम्यानचे उड्डाणपूल पाडण्याच्या कामात संबंधित विविध खात्यांमध्ये समन्वय रहावा यासाठी समिती नेमण्यात आली असून पूल पाडण्याची कार्यवाही होईपर्यंत या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जाईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज (मंगळवार) सकाळपासून सुरुवात झाली. या ठिकाणी आमदार शिरोळे यांनी भेट दिली आणि पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त(वाहतूक) डॉ.संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त(वाहतूक) सुंद्रेंद्र देशमुख, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, पीएमआरडीएचे अधिकारी, पुणे महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

उड्डाणपूल पाडण्याचे काम सुनियोजित आणि वेळेत होण्यासाठी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये समन्वय रहायला हवा, समन्वय ठेवण्यात काही समस्या येत असतील तर मला सांगा. माझ्यापरीने समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न राहील. आपल्यात समन्वय चांगला असेल तर मुदतीतच हे काम होऊ शकेल असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. पूल पाडण्याचे काम पंधरा दिवसातही पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.

उड्डाणपूल पाडून नवीन बांधकाम होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेकडे अत्यंत बारकाईने लक्ष देण्यात येईल. कामाचा पाठपुरावा मी सातत्याने करणार आहे. नवीन काम होताना त्यात कोणताही दोष राहू नये आणि वाहनचालकांना त्रास होऊ नये याकडे माझा कटाक्ष राहील असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.