Coronavirus Impact : ‘करोना’मुळं दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शनबारी आज रात्रीपासून बंद

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील तमाम रहिवाशांचे आराध्य कुलदैवत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा देवाची दर्शनबारी आज रात्रीपासून बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे. कोरानामुळे जोतिबा देवाचेही दर्शन बंद करण्यासंदर्भात हालचाली काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज रात्रीपासून दर्शनबारी बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबा दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सार्वजनिक स्थळे, उद्याने,  बागा, मॉल, थिएटर, शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर जोतिबा दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने केला आहे. विशेषतः दर रविवारी हजारो भाविक श्री क्षेत्र कोल्हापूरला जाउन जोतिबाचे दर्शन घेत असतात. मात्र, आजपासून जोतिबा मंदीर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागणार  आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मंदीर समितीने दर्शनबारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच यंदाची चैत्र वारीही रद्द होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.