दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्‍का : भारताबरोबरच्या सामन्याआधीच ‘हा’ खेळाडू वर्ल्डकप बाहेर

लंडन : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिका संघाचा अनुभवी, वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाल्यामुळे त्याला आता वर्ल्डकपमध्ये खेळता येणार नाही. खांदा दुखावल्यामुळे डेल स्टेनला आतापर्यंत झालेले दोन्ही सामने खेळता आले नाहीत. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाल्याचे दिसून आले. आता स्टेनच्या जागी ब्युरन हेंड्रिक्स या खेळाडूचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश करण्यात आला आहे. ब्युरन हेंड्रिक्स हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना उद्या ५ जूनला होणार आहे. त्या आधीच दक्षिण आफ्रिकेला झटका बसला आहे.

खांद्याचे दुखणे पडले महागात

जवळपास दोन वर्षांपूर्वी डेल स्टेनला औस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या सामन्यात खांदा दुखावला होता. या नंतर जवळपास दोन वर्ष स्टेनला फार कमी क्रिकेट खेळायला मिळाले. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर लहान रन अप घेऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्टेनने केला होता. २०१६ साली स्टेनने त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली होती.

दक्षिण आफ्रीकेच्या समोरील संकटांत वाढ

आतापर्यंतची दक्षिण आफ्रिकेची वर्ल्डकपमधील कामगिरी खूप खराब राहिली आहे. वर्ल्डकपच्या पहिल्याच झालेल्या सामन्यात इंग्लंडने आफ्रिकेचा दारुण पराभव केला होता. आता उद्या दक्षिण आफ्रिकेची लढत भारताबरोबर असणार आहे.