धक्कादायक ! लग्नात समोरच जेवायला बसल्याने ‘त्यांनी’ केली दलित तरुणाची हत्या

डेहराडून : वृत्तसंस्था – लग्नात समोर जेवायला बसला म्हणून, कथीत सवर्ण जातीतील लोकांना राग आला आणि त्यांनी दलित तरुणाला बेदम मारहाण केली. उत्तराखंडच्या तेहरी जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. डेहराडून येथे उपचारादरम्यान काल सोमवारी या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याविरोधात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलीस उपाधिक्षक उत्तम सिंह जिमवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दलित तरुण जितेंद्र हा कथीत कनिष्ठ जातीचा होता. त्याने लग्नात आपल्या समोर बसून जेवण करणे कथीत सवर्ण जातीतील काही लोकांना रुचले नाही, त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी जितेंद्रला बेदम मारहाणी केली. मृत तरुणाच्या बहिणीच्या तक्रारीवरून या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सात जणांमध्ये गजेंद्र सिंह, सोबन सिंह, कुशल सिंह, गब्बर सिंह, गंभीर सिंह, हरबीर सिंह आणि हुकूम सिंह यांचा समावेश आहे.

या प्रकरणात लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपाधिक्षक उत्तम सिंह जिमवाल यांनी सांगितले.