आजही देशातील दलितांना गावकुसाबाहेर राहावे लागते

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशाला स्वातंत्र्य मिळून 70 हून अधिक वर्षेे झाली; मात्र आजही देशातील दलितांना गावकुसाबाहेर राहावे लागते. असे वक्तव्य करत आमदार जिग्नेश मेवानी यांनी जातीय व्यवस्थेवर हल्ला चढवल्याचे समोर आले आहे. नवव्या भारतीय छात्र संसदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली.

आमदार जिग्नेश मेवानी नवव्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्राच्या ‘जातीयवाद आणि भ्रष्टाचार : भारतीय लोकशाहीवरील मोठा कलंक’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की, “देशाला स्वातंत्र्य मिळून 70हून अधिक वर्षेे झाली; मात्र आजही देशातील दलितांना गावकुसाबाहेर राहावे लागते. देशातील 70 टक्क्यांहून अधिक दलित भूमीहीन आहेत. मंदिराची घंटा कोण वाजवेल आणि गटारामध्ये कोण उतरेल हे जातीय व्यवस्थेने देशाला शिकविले. परिणामी आजही देशातील दलितांना गावकुसाबाहेर राहावे लागत आहे.”

या वेळी थेरिकेअर टेक्नॉलॉजी लि.चे अध्यक्ष डॉ. ए. वेलूमनी, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, बंगळुरू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. आर. वेणुगोपाल, एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. ए. वेलूमनी म्हणाले, “ग्रामीण क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. येथे अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ग्रामीण भागातून शिकवण घेणे भविष्याला कलाटणी देणारे आहे.”

तर डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, “जगातील सर्व जातीच्या नागरिकांची मानवता ही एकच जात आहे. जातीयतेमुळे भारत पोखरला जात आहे. उच्च शिक्षित नागरिकच जातीयता पाळताना सध्याला दिसतात.”

अजमेर (राज्यस्थान) येथील चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद सलमान चिस्ती, भागवत कथाकार वैभव अलेकर, निजामुद्दीन औलिया दर्गा दिल्लीचे सय्यद अजमल निजामी, उडीसा येथील राजेश्‍वरी देवी यांना युवा आध्यात्मिक गुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.