संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातील ‘या’ नेत्याच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; ‘डॅमेज कंट्रोल’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राठोड मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. आज सकाळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन राठोड आज राजीनामा देणार असल्याचे सूचक विधान केले होते. यानंतर वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारला.

दुसरीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे बंजारा समाज नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राठोड यांना पदावरुन काढून टाकणे म्हणजे बंजारा समाजाच्या मोठ्या नेतृत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काही जणांकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाज नाराज होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे राज्यमंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी इंद्रनील नाईक सध्या मुंबईत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आजपर्यंत राज्यात बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये वसंतराव नाईक, मनोहरराव नाईक, संजय राठोड यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. बंजारा समाजाची नाईक कुटुंबावर श्रद्धा आहे. याशिवाय इंद्रनील नाईक हे मनोहरराव नाईक यांचे पूत्र आणि वसंतराव नाईक यांचे नातू आहेत. त्यामुळे बंजारा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी इंद्रनील नाईक यांच्याकडे मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.