काय सांगता ! होय, नगर झेडपीतील अधिकारी गेले दौऱ्यावर आणि थेट पोहचले बारीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकं कल्पना ही नसते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नादाला लागतात. उगाच गाणं नाही “नाद करायचा नाय”. जिल्हा परिषदेच्या अशाच एका अधिकाऱ्याने नाद केला पण तो त्यांच्या अंगलट आला. जाणून घ्या कसा अंगलट आला हा नाद… जिल्हा परिषदेतील एका विभागात प्रभारी म्हणून कामकाज करीत असलेले अधिकारी नुकतेच एका तालुक्‍याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्याबरोबर कार्यालयातील काही जण सोबत होते. कामकाज आटोपल्यानंतर ते नगरकडे परत येत असताना, त्यांना “छमछम’ पाहण्याचा मोह आवरता आला नाही. बराच वेळ त्यांची मैफल रंगली. त्यांनी एका गाण्यावर ठेकाही धरला.

दरम्यान, नगर जिल्ह्याच्या दक्षिणेतील एका तालुक्यात ते दौऱ्याला गेले. तेथे त्यांनी थेट बारी गाठली. तेथे त्यांनी ताल धरला त्यामुळे सोबतचेही बेताल झाले. रात्रीचा हा कुटाणा सकाळी सगळीकडे व्हायरल झाला. ठेका धरलेल्या अवस्थेत त्यांचे मोबाईलवर फोटोसेशन झाले. हे प्रभारी अधिकारी नगरला पोचताच, रात्री ठेका धरलेले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याची गंभीर दखल घेत, प्रशासनाने त्यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेतला. तत्पूर्वी गाण्यावर ठेका धरलेला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोटो काढणारा कोण, याचा शोध ठेका धरणाऱ्यांसह इतर कर्मचारीही घेत आहेत.

दरम्यान, दौऱ्यावरून परत येताना संबंधित अधिकाऱ्यांना “छमछम’ केंद्रावर कोणी नेले, याचा शोध घेणे गरजेचे आहे. या अधिकाऱ्यासोबत असणाऱ्यांचीही प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे. गुप्त पद्धतीने ही चौकशी सुरू आहे. या पूर्वीही असे प्रकार घडले असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकशी समिती नेमून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.