नाशिक : कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करत पोलिस प्रबोधिनीतच डान्स पार्टी (Video)

नाशिक : राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यानुसार, सरकारकडून कोरोना नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र, खुद्द पोलिस प्रबोधिनीतच कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करत डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे आता याचीच चर्चा सुरु आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यावरूनच ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच सॅनिटायझिंगवर विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. पण भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता आणि मास्क न वापरताच पोलिस नाचत होते.

दरम्यान, या डान्स पार्टीचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये अनेकजण कोरोनासंबंधी कोणत्याही नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. पार्टीत डान्स करणारे हे सर्वजण येत्या 30 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या दीक्षांत सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हे सर्वजण पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

कोरोनाग्रस्तांचा आकडा चार हजारांवर

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4,099 वर गेली आहे. तर नाशिक शहरात कोरोनाचे 2,090 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील ही वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण ठरत आहे. त्यातच आता भावी पोलिसांकडून अशाप्रकारे उल्लंघन केले जात असल्याने यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.