पुणे : त्वरित निदान व उपचारामुळं महिलेची उलटी झालेली गर्भपिशवी पूर्ववत करण्यात यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या अंगावरून चार ताांपासून गर्भजलाचे पाणी जात होते. त्यामुळे या महिलेला तातडीने पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील प्रसुतीगृहात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आरटीसीपीआर तपासणी करण्यात आली. या महिलेने 23 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास बाळाला जन्म दिला.

महिलेच्या प्रसुतीनंतर तिची गर्भपिशवी उलटी होऊन योनीमार्गातून बाहेर आली. त्यामुळे अचानक हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब कमी झाल्याने महिलेवर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. उपचार करून तिची उलटी झालेली गर्भपिशवी सामान्य स्थितीत करण्यात आली. जागरुख देखरेख, त्वरित निदान, गर्भाशयाच्या त्वरित पुनस्थापनेमुळे धोका टळला आणि कमी रक्तस्त्राव झाला. गर्भाशय चांगल्या स्थितीत राहिले असून डॉक्टर रुग्णावर सतत निरीक्षण व तपासणी करत होते.

दरम्यान, गर्भावस्थेत केलेल्या सोनोग्राफीमुळे बाळाची वार गर्भाशयाच्या वरील बाजूस असल्याने गर्भाशय पलटी झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान महिलेचा आरटीसीपीआर चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला कोविड कक्षामध्ये पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले. सुदैवाने बाळाची टेस्ट निगेटिव्ह आली असून बाळाला आईपासून विलग ठेवण्यात आले आहे. आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गर्भाशय अंतर्बाह्य उलटे ही एक दुर्मिळ आणि जीवघेणी गुंतागुंत आहे. यामध्ये 15 टक्के मातांचा मृत्यू होतो. जागरुख देखरेख, सक्रिय व्यवस्थापन आणि भर्गाशयावर जास्त दाब न देता हळुवारपणे वार काढणे इत्यादी उपाय केल्यामुळे गर्भाशय उलटे होत नाही. महिलेवर ससून सर्वोपचार रुग्णालयातील पथक प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली जाधव, डॉ. स्नेहल तिनाईकर, डॉ. अनुष्का माने यांच्या पथकाने यशस्वी उपचार करून बाळ आणि माता यांचे प्राण वाचवले.

अशाप्रकारे ससून रुग्णालयात अतिशय जोखमीचे कोरोनाबाधित रुग्ण, तीव्र रक्तदाब, झटका येणे प्रसूतीपूर्व वाढ झाल्यामुळे होणारा रक्तस्त्राव, रक्तक्षय, पूर्वी एक किंवा दोन सिझर झालेल्या गरोदर मातांची प्रसुती स्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या झाल्या आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सर्व निवासी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.