चिंताजनक ! 7 दिवसांमध्ये 21 कोरोनाबाधित प्रवासी हवाईमार्गे आले पुण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुस-या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतील विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. या चाचणीत पुण्यात आलेले 21 प्रवासी बाधित आढळून आले आहेत. चाचणी अहवाल नसलेल्या 507 प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली होती.

दिवाळीच्या कालावधीत देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले होते. कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. दि. 25 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. तर रेल्वे प्रवाशांना लक्षणे दिसल्यास स्थानकावरच अँटीजेन चाचणी केली जात आहे. पुणे विमानतळावर दि. 1 डिसेंबरपर्यंत दिल्लीतून सर्वाधिक 12 हजारांहून अधिक प्रवासी पुण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ राजस्थान 972 , गुजरातमधील 560 प्रवासी होते. या कालावधीत गोव्यातून एकही विमान आले नाही.

507 प्रवाशांकडे आसपीसीआर चाचणीचा रिपोर्ट नव्हता
विमानतळावर दाखल झालेल्या एकुण 13 हजार 772 प्रवाशांपैकी 507 प्रवाशांकडे आरपीसीआर चाचणीचा रिपोर्ट नव्हता. त्यांची विमानतळावर चाचणी केली. त्यापैकी 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली. हे प्रमाण जवळपास 4 टक्के एवढे आहे. चाचणी करतेवेळी यावेळी या प्रवाशांचा संपर्क क्रमांक घेतला जातो. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व पालिका प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही केली जाते.

विमानतळावरील चाचण्यांची स्थिती
ठिकाण एकुण प्रवासी
गुजरात : 560
दिल्ली :  12, 240
राजस्थान : 972
एकुण : 13, 772
आरटीपीसीआर : 507
बाधित : 21