दापोडी येथील दुर्दैवी घटना : ठेकेदारासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अमृत योजनेअंतर्गत दापोडी येथे सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्यात अडकून अग्निशमन दलाचे जवान आणि कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदारासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मालक एम. बी. पाटील, सब कॉन्ट्रॅक्टर अशोक माणिकराव पिल्ले, सब कॉन्ट्रॅक्टर सुनील रमेश शिंदे, सुपरवायझर धनंजय सुधारक सगट यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कल्याणी पिरप्पा जमादार (56, रा. ओमकार वस्ती, फुगेवाडी. मूळ रा. कर्नाटक) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर नागेश कल्याणी जमादार (22) आणि विशाल जाधव असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मे. पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम घेतले होते. रविवारी सुट्टी असल्याने काम बंद होते. मात्र, पाईपलाईनसाठी खोदकाम करत असताना आरोपींनी सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी न घेता कामगारांना काम करण्यासाठी ड्रेनेजच्या लाईनमध्ये उतरवले. तसेच आरोपींनी सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता काम करून घेतले. दरम्यान, वरून पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकून मजुराचा मृत्यू झाला. याबाबत ठेकेदारासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे करीत आहेत.

Visit : policenama.com