दापोडीतील खड्यात अग्निशमनच्या जवनासह कामगाराचा मृत्यू, मध्यरात्री उशिरा काढला कामगाराचा मृतदेह बाहेर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – अमृत योजनेअंतर्गत दापोडी येथे सुरू असलेल्या पाईप लाइन टाकण्यासाठी खोदलेल्या तीस फूट खोल खड्यात मातीचा ढिगारा कोसळून अडकलेल्या कामगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचा एक जवान शहिद झाला. तर ढिगाऱ्याखाली गाडला गेलेल्या कामगाराचाही मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ व सीएमईच्या जवानानी रात्री उशिरा रेस्क्यू ऑपरेशन करुन मृतदेह बाहेर काढला. ही घटना दापोडी येथे रविवारी (१ डिसेंबर) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची चौकशी समिती नेमली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

अग्निशमनचा फायरमन विशाल जाधव (रा. मोशी टोल नाक्याजवळ, मोशी) हे शहिद झाले आहेत. तर कामगार नागेश कल्याणी जमादार याचाही मृत्यू झाला. सरोज पुंडे, निखिल गोगावले या दोन जवानांसह ईश्वर सुर्यकांत बडगे (१८), सिताराम कैलास सुरवसे (वय २०) यांना बाहेर काढण्यात आले आहे. पुंडे व गोगावले या दोघांना माकन रुग्णालयात तर बडगे व सुरवसे या दोघांना मोरया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दापोडी येथील विनियार्ड चर्चजवळ असलेल्या पाण्यांच्या टाक्यांशेजारी गेल्या चार-पाच दिवसांपासून मोठी ड्रेनज टाकण्याचे महापालिकेकडून ठेकेदारामार्फत सुरू आहे. तीस फूट खोल, पाच फूट रुंद तर ३० फूट लांब असा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्यात काम करताना जमादार व त्याचा एक सहकारी माती अंगावर पडल्याने गाडले गेले. त्यामुळे या दोघांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवक बडगे व सुरवसे हे खड्यात उतरले. मात्र, भुसभूशित झालेली माती या दोघांच्यावर कोसळली. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमनदलाची एक गाडी व जवान घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांच्याकडून मदतकार्य राबविले जात होते. बडगे व सुरवसे या दोघांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

मोठा खड्डा असल्याने जमिन भुसभुशित झाली होती. त्यातच बघ्यांच्या गर्दीने खड्यातून बाहेर काढलेल्या मातीचा ढिगारा जवान अंगावर कोसळला. यात तीन जवानांसह जमादार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तत्काळ ही माहिती पोलिस आणि अग्निशमन नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या १० गाड्या, ५ रुग्णवाहिका व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाने पुंडे, गोगावले व जाधव या तिघांना बाहेर काढले. यापैकी जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, विरोधी पक्षनेते नाना काटे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामानाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पोलिस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी दाखल झाले होते.

अग्निशमन विभागाने एनडीआरएफ आणि लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाला मदतीसाठी पाचारण केले होते. ही दोन्ही पथक रात्री नऊ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पथकांनी रेस्क्यु ऑपरेशन हाती घेतले. त्यांनतर जमादार याचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला.

आजची ही घटना दुर्दैवी आहे. सकृत दर्शनी ठेकेदाराकडून योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका शहर अभियंता आणि सहशहर अभियंता या दोघांची चौकशी समिती नेमली आहे. गरज पडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

Visit : policenama.com